बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
कृषी प्रदर्शन शनिवार २४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
कृषी प्रदर्शन शनिवार २४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे
बारामती वार्तापत्र
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार १८ जानेवारी रोजी राज्यासह परराज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, हरियाणा आदी राज्यांतून शेतकरी या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आले होते.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि भविष्यातील शेतीची दिशा दाखवणाऱ्या प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. मातीविना शेती (हायड्रोपोनिक्स), व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळपिकांची लागवड, एक खोड पद्धतीने डाळिंब व पेरू लागवड, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर आधारित तूर, केळी व कांदा लागवडीचे प्रयोग पाहून शेतकरी विशेष प्रभावित झाले.
विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीच्या दालनास शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ऊसाच्या विविध जाती, त्यांची वाढ, उत्पादनक्षमता तसेच एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाण्याचा, खतांचा व रोगनियंत्रणाचा कसा अचूक वापर करता येतो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाविषयी प्रश्न विचारून प्रत्यक्ष प्रकल्पात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली.
प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. आधुनिक शेती, तंत्रज्ञानाधारित पीक व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आदी विषयांवरील प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. तसेच विविध खासगी कंपन्यांच्या स्टॉलवर पिकांच्या सुधारित वाणांची, बियाण्यांची, खतांची व कृषी अवजारांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची सतत गर्दी दिसून येत होती.
या प्रदर्शनाचा एक विशेष आकर्षण म्हणून ट्रस्टचे विश्वस्त रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना देशी अश्वसंवर्धनाबाबत माहिती मिळाली आणि उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
दरम्यान, डॉ. ललित कुमार धायगुडे, अवर सचिव, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन विविध तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली. त्यांनी कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रदर्शनादरम्यान ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे हे स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नियोजन व मार्गदर्शन करत होते.
सदर कृषी प्रदर्शन शनिवार २४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी केले आहे.






