बारामतीतील कॅनॉलमध्ये फुले टाकण्याचा प्रकार कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाचीही दखल नाही
कॅनॉल परिसरात सिक्युरिटी गार्डही नियुक्त करण्यात आले आहेत.

बारामतीतील कॅनॉलमध्ये फुले टाकण्याचा प्रकार कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाचीही दखल नाही
कॅनॉल परिसरात सिक्युरिटी गार्डही नियुक्त करण्यात आले आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती परिसरातील कॅनॉलमध्ये फुले,नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य टाकण्याचा प्रकार सातत्याने सुरूच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कॅनॉलची स्वच्छता राखा, दुर्गंधी पसरू देऊ नका असे स्पष्ट आवाहन केले असतानाही काही नागरिक या सूचनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
स्थानिक नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या काही लोकांकडून देवपूजेनंतरची फुले आणि साहित्य थेट कॅनॉलमध्ये फेकण्यात येत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. यासाठी कॅनॉल परिसरात सिक्युरिटी गार्डही नियुक्त करण्यात आले आहेत.मात्र त्यांच्या नजरेला चुकवत काही लोक नियम तोडताना आढळले.
या प्रकारामुळे काही दिवसातच कॅनॉल परिसरात पुन्हा दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला असून नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. वारंवार सूचना करूनही काही लोकांकडून असे प्रकार सुरू राहिल्यास प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
बारामतीकरांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कॅनॉलचे सौंदर्य आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.






