बारामतीतील खांडज गावात बिबट्या सीसीटीव्हीत कैद; वनविभागाकडून अधिकृत दुजोरा
बिबट्याने या परिसरात कुटुंबासह वावर सुरू केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

बारामतीतील खांडज गावात बिबट्या सीसीटीव्हीत कैद; वनविभागाकडून अधिकृत दुजोरा
बिबट्याने या परिसरात कुटुंबासह वावर सुरू केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खांडज गावातील एका शेत परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेला वनविभागाने अधिकृत दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यापूर्वी बारामती कसबा भागात समोर आलेला बिबट्याचा व्हिडिओ हा AI-जनरेटेड असल्याचा दावा वनविभागाने केला होता.
त्यामुळे संपूर्ण तालुक्यात बिबट्याच्या अस्तित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता खांडज गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे बिबट्याचा वावर खरा असल्याचे सिद्ध झाले आहे.
काल रात्री खांडज बावीस फाटा येथील श्रीरामनगर आडवा बांध परिसरात, दत्तात्रेय नामदेव आटोळे यांच्या शेतात बिबट्या दिसून आला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाला असून, संबंधित व्हिडिओची पाहणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. वन कर्मचारी गोलांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.यावेळी रेस्क्यू टीम श्रेयस कांबळे यांनी सहकार्य केले.
या पाहणीदरम्यान राजू चव्हाण, माऊली जाधव, मिथुन आटोळे, निलेश आटोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दौंड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या भागांनंतर आता पुन्हा एकदा बारामती तालुक्यात बिबट्याचा प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे बिबट्याने या परिसरात कुटुंबासह वावर सुरू केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर खांडज ग्रामपंचायतीने वनविभागाकडे तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, शेतात एकटे काम करू नये आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.






