बारामतीतील घटना; दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आजीलाही मारहाण

बारामतीतील घटना; दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न!
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आजीलाही मारहाण
बारामती वार्तापत्र
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका युवकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. त्याची आजी भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही कुर्हाडीने डोक्यात मारत दुखापत करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीसह शस्त्र अधिनियम, अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मंगेश सुभाष मदने व गणेश उमरदंड (रा. माळेगाव रोड, भीमरत्ननगर, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यमुना विलास कुचेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी ही नातू कौशल सोमनाथ कुचेकर यांच्यासह माळेगाव रस्त्यावर भीमरत्ननगर येथे राहते. तिचा नातू कौशल हा क्रिकेट खेळत असताना मदने व उमरदंड हे दोघे तिथे आले. त्यांनी त्याच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तो पुन्हा क्रिकेट खेळण्यास गेला.
काही वेळाने तो खेळत असलेल्या ठिकाणाहून आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे फिर्यादी घराबाहेर आली असता कौशल याच्यामागे मंगेश मदने हा कोयता हातात घेऊन धावत असल्याचे दिसून आले. त्याने कोयता कौशल याच्या पोटरीवर मारला.
ते पाहून फिर्यादीने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, मदने याने पानटपरीवर ठेवलेली कुर्हाड घेऊन येत धारदार बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारली. उमरदंड याने जातिवाचक शिवीगाळ केली. शेजारील गॅस पंपावरील कर्मचार्यांनी पळत येत ही भांडणे सोडवली. त्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.