बारामतीतील तहसील कार्यालयातील तलाठी महिला अधिकारी वारंवार अनुपस्थित; नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे
सर्व कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त

बारामतीतील तहसील कार्यालयातील तलाठी महिला अधिकारी वारंवार अनुपस्थित; नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे
सर्व कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त
बारामती वार्तापत्र
तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयात नागरिकांच्या विविध कामांसाठी नियुक्त असलेल्या महिला तलाठी अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे उत्पन्न दाखला, वारस नोंद, सातबारा नोंद तसेच संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
तलाठी कार्यालयात दररोज अनेक नागरिक शासकीय कागदपत्रांसाठी येत असतात. मात्र संबंधित महिला अधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे नागरिकांचे काम रखडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक वेळा नागरिक तासन्तास कार्यालयात थांबत असतात, परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.
विशेष म्हणजे, संबंधित महिला अधिकाऱ्यांचे काही सहकारी त्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांची कामे करताना दिसून येत आहेत.
तरीदेखील सर्व कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत चौकशी करावी आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयातच अधिकारी अनुपस्थित राहत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






