शैक्षणिक

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘सर्जनशील लेखन कार्यशाळा’ संपन्न

भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि लेखनातून स्वतःच्या भावना व विचार प्रभावीपणे व्यक्त

बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ‘सर्जनशील लेखन कार्यशाळा’ संपन्न

भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि लेखनातून स्वतःच्या भावना व विचार प्रभावीपणे व्यक्त

बारामती वार्तापत्र

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील मराठी विभाग व उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सर्जनशील लेखन कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक, कीर्तनकार व सूत्रसंचालक प्रा.स्वामीराज भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्जनशील लेखनाकडे वळण्यासाठी चांगल्या वाचनाची सवय असणे आवश्यक आहे. वाचन चांगले असेल, तर आपण समूहाचे प्रभावी नेतृत्व करू शकतो. चांगली माणसे समजून घेण्यासाठी आधी माणसे वाचायला शिकले पाहिजे. तसेच, लेखन करताना अफाट निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती, परिसर प्रत्यक्ष पाहून वर्णन करणे इ. गोष्टी महत्त्वाच्या असून, त्यांच्या आधारे आपण उत्तम आणि प्रभावी लेखन करू शकतो,” असे मत प्रमुख वक्ते प्रा.स्वामीराज भिसे यांनी व्यक्त केले.

लेखनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखनाची ओळख करून देणे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि लेखनातून स्वतःच्या भावना व विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश सदर कार्यशाळेतून संपन्न झाला. लेखनातील विविध शैली, विषयांची निवड, आशयाची मांडणी आणि अभिव्यक्तीची प्रभावी पद्धत याविषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.अविनाश जगताप यांनी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविले. मराठी विभागप्रमुख व कला शाखेच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. सीमा नाईक-गोसावी यांनी  कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक केले. उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक प्रा. प्राजक्ता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती  लाभली.कार्यशाळेच्या समन्वयक प्रा.डॉ.मुक्ता आंभेरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आभार प्रदर्शन प्रा.डॉ.संतोष डफळापूरकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मराठी विभागातील  डॉ.सुषमा जाधव, प्रा.सोमनाथ कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button