बारामतीतील दशक्रिया विधी परिसरात पार्किंगचा गंभीर प्रश्न; स्थानिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
काही स्थानिक नागरिकांकडून या पार्किंग जागांमध्ये कायमस्वरूपी खासगी वाहने लावून ठेवली जात

बारामतीतील दशक्रिया विधी परिसरात पार्किंगचा गंभीर प्रश्न; स्थानिकांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
काही स्थानिक नागरिकांकडून या पार्किंग जागांमध्ये कायमस्वरूपी खासगी वाहने लावून ठेवली जात
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका हद्दीतील आप्पासाहेब पवार मार्गावर असलेल्या दशक्रिया विधी परिसरात शासन व नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत.
अंत्यसंस्कार व दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात, वाहतुकीची कोंडी टळावी आणि परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित राहावा, या उद्देशाने रस्ते, पार्किंग व इतर सोयी विकसित करण्यात आल्या आहेत.
मात्र सध्या या परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या बाबूजी नाईक वाडा तसेच दशक्रिया विधीच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या पार्किंग जागांचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
काही स्थानिक नागरिकांकडून या पार्किंग जागांमध्ये कायमस्वरूपी खासगी वाहने लावून ठेवली जात असल्यामुळे दशक्रिया विधीसाठी दूरवरून येणाऱ्या लोकांना वाहन उभे करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागत असून, परिणामी आप्पासाहेब पवार मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. शोकाकुल वातावरणात आलेल्या नातेवाईकांना या परिस्थितीमुळे अधिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पार्किंग जागांमधून कायमस्वरूपी उभ्या असलेल्या वाहनांना तात्काळ हटवून, दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग मोकळे करून द्यावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक पार्किंगचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर नगरपालिकेने कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना केल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.






