बारामतीतील देशपांडे विद्यालयात ४६ व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
दोन हजार खेळाडूंनी सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे विद्यालय बारामती प्रशालेच्या भव्य मैदानावर ४६व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू आरती भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात पाचवी ते बारावी मधील सुमारे दोन हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आहे .
प्रमुख अतिथी आरती भगत उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या की खेळाडूच्या आयुष्यात क्रीडा प्रशिक्षक अतिशय महत्त्वाचे असतात. विपरीत परिस्थितीला न घाबरता ध्येयावर लक्ष ठेवून खेळत राहा; थांबू नका, यश आपोआपच मिळेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी अपयश आले तरी घाबरून खचून न जाता मेहनत,जिद्द,चिकाटीने भरपूर प्रयत्न करून खेळत रहा, मोबाईल पासून दूर रहा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, क्रीडा महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रशांत सोनवणे,पर्यवेक्षक शेखर जाधव, दिलीप पाटील,जयश्री शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वरम जाधव व शिवांजली साळुंखे मंचावर उपस्थित होते.
यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, मएसो परिवारातील सर्व पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,यांनी महोत्सवासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल गोंजारी यांनी केले तर आभार क्रीडा महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी मानले.