बारामतीतील नामांकित संस्थेवर चेअरमनपदावर त्याच व्यक्तीची पुन्हा निवड इतर संचालक नाराज
पुन्हा संधी देण्यात आल्याने इतर संचालकांमध्ये नाराजीचे सूर

बारामतीतील नामांकित संस्थेवर चेअरमनपदावर त्याच व्यक्तीची पुन्हा निवड इतर संचालक नाराज
पुन्हा संधी देण्यात आल्याने इतर संचालकांमध्ये नाराजीचे सूर
बारामती वार्तापत्र
तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, शहरातील एका नामांकित संस्थेच्या चेअरमन पदाच्या फेरनिवडीवरून आता वातावरण तापू लागले आहे. विद्यमान चेअरमन यांनाच पुन्हा संधी देण्यात आल्याने इतर संचालकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संस्थेत दरवर्षी परंपरेनुसार चेअरमन पदाची फेरनिवड केली जाते. याच अनुषंगाने यंदाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान चेअरमन यांचा राजीनामा घेण्यात आला होता. नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा उद्देश यामागे असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक संचालकांनीही यावेळी आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला अनपेक्षित वळण मिळाले. संस्थेतील काही प्रभावी पदाधिकाऱ्यांनी थेट युवा नेतृत्वाशी संपर्क साधल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर अचानक विद्यमान चेअरमन यांचा राजीनामा मागे घेण्याचे निर्देश मिळाले आणि पुन्हा एकदा त्यांच्याच हाती संस्थेची धुरा सोपवण्यात आली.
या निर्णयामुळे अनेक इच्छुक संचालक नाराज झाल्याचे बोलले जात आहे. “परंपरेनुसार बदल होईल” या अपेक्षेवर काही सदस्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी झालेल्या या बदलामुळे त्यांच्यात असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. काही संचालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना अंतर्गत चर्चांमध्ये तीव्र प्रतिक्रिया दिल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घडामोडीमुळे बारामतीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, युवा नेतृत्वाचा वाढता प्रभाव आणि पारंपरिक निर्णय प्रक्रियेत होत असलेले बदल यामुळे आगामी काळात इतर संस्थांमध्येही अशाच प्रकारचे निर्णय पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
एकूणच, चेअरमन पदावर पुन्हा त्याच व्यक्तीची नियुक्ती झाल्याने संस्थेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले असून, पुढील काळात याचे पडसाद बारामतीच्या व्यापक राजकारणात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.






