बारामतीतील मोतीबागेजवळ ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू घटना
वाहनावरील नियंत्रण सुटले तो दुभाजकाला धडकून पलटी झाला.
बारामतीतील मोतीबागेजवळ ट्रक पलटी झाल्याने एकाचा मृत्यू घटना
वाहनावरील नियंत्रण सुटले तो दुभाजकाला धडकून पलटी झाला.
बारामती वार्तापत्र
साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक भरधाव वेगाने दुभाजकाला धडकल्यामुळे ट्रक पलटी होवून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव संजय मोर असे आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक होता. या अपघातानंतर ट्रकचालक साठे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. मंगळवारी (दि.३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात लहू औदुंबर धुमाळ (रा. धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. फिरयादीनुसार, लहू धुमाळ, राजू भोसले व संजय मोरे हे येथील आनंद ब्रास बॅण्डमध्ये वाजंत्री म्हणून काम करतात. मंगळवारी ते काटेवाडीच्या पुढे आर्या गार्डन येथील विवाह समारंभात सनई-चौघडा वाजवण्यासाठी गेले होते.
सायंकाळी विवाह समारंभ आटोपल्यावर राजू भोसले याने धुमाळ व संजय मोरे या दोघांना काटेवाडीत दुचाकीवरून आणून सोडले. तुम्ही दोघे एसटीने बारामतीला जा, असे सांगून तो निघून गेला. दरम्यान एका ट्रकला हात करत हे दोघे ट्रकमध्ये बसले. हा ट्रक साखरेच्या पोत्यांनी भरलेला होता. चालकाने या दोघांना बारामतीला सोडतो, ३० रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. बारामतीच्या दिशेने ट्रक येत असताना मोतीबागेजवळ चालकाने ट्रक भरधाव वेगाने हाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तो दुभाजकाला धडकून पलटी झाला. या अपघातात क्लिनर बाजूला बसलेल्या संजय मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. धुमाळ गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीच्या साठे नावाच्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.