बारामतीतील वैद्यकीय सुविधेत आणखी भर कॅन्सर हॉस्पिटल उभारणीस राज्य शासनाची मान्यता..
संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.

बारामतीतील वैद्यकीय सुविधेत आणखी भर कॅन्सर हॉस्पिटल उभारणीस राज्य शासनाची मान्यता..
संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
कर्करोगाने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर सुविधा निर्माण व्हावी आणि त्यांचा वेळ व पैसा वाचावा या उद्देशानं राज्य शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न कॅन्सर रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारामतीत तृतीय स्तरावरील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाच्या उभारणीला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील वैद्यकीय सुविधेत आणखी भर पडून परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
या संदर्भातील अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.
या निर्णयामुळे बारामती पंचक्रोशीतील कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या साठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प बारामतीत आता प्रत्यक्षात साकारणार आहे. बारामती एमआयडीसीतील एसटी वर्कशॉप चे स्थलांतर करून त्या जागी कॅन्सर रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात एसटी वर्कशॉप चे स्थलांतर केले जाणार आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत नर्सिंग महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल उभे राहणार असल्याने हा परिसर मेडिकल हब म्हणून आता उदयास येईल. बारामती सोबतच अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, जळगाव व रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संल्लग्नित रुग्णालये, ठाणे (जिल्हा रुग्णालय संलग्नित) व शिर्डी संस्थानचे रुग्णालय अशी एकूण ९ केंद्रे तृतीय स्तर (L3) म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाने बारामतीसह अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा आणि आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, जळगाव, रत्नागिरी, ठाणे (जिल्हा रुग्णालय संलग्न) आणि शिर्डी संस्थानचे रुग्णालय या नऊ ठिकाणी तृतीय स्तरावरील कॅन्सर उपचार केंद्रांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री निमंत्रित सदस्य असणार आहेत.
भविष्यातील वाढत्या मागणीचा विचार करून, या तृतीय स्तरावरील संस्थांचे रुपांतर उच्च स्तरावरील (L2 आणि L1.2) संस्थांमध्ये करण्यास आणि संस्थांची संख्या १३ पर्यंत वाढविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे. जे.), कोल्हापूर, पुणे (बीजे), नांदेड, तसेच नाशिक आणि अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कर्करोगासंबंधी पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण (MD/MS, DM/MCH, DNB, Fellowship) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ₹१४७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. तृतीय स्तरावरील संस्थांचे बांधकाम शासनामार्फत होईल, तर यंत्रसामुग्री खरेदी, मनुष्यबळ आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) धोरण अवलंबले जाणार आहे. या निर्णयामुळे बारामती आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक कॅन्सर उपचाराची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे, तसेच या परिसराच्या वैद्यकीय क्षेत्रातील विकासाला अधिकचा वेग येणार आहे.






