स्थानिक

बारामतीतील व्यापाऱ्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

शहरात सुमारे २५० हॉटेल व्यवसायिक असून मिठाई व स्वीट होम दुकानदारांची संख्या किमान ६० आहे

बारामतीतील व्यापाऱ्यांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

शहरात सुमारे २५० हॉटेल व्यवसायिक असून मिठाई व स्वीट होम दुकानदारांची संख्या किमान ६० आहे

बारामती वार्तापत्र 

शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने बारामतीतील व्यापाऱ्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. बारामती व्यापारी महासंघ तसेच विविध व्यापारी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामती व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम बारामती शहरातील व्यावसायिकांवर होत आहे.

शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने हॉटेल, स्वीट होम, मिठाई दुकाने तसेच इतर खाद्यव्यवसाय अडचणीत आले आहेत.
बारामती शहरात सुमारे २५० हॉटेल व्यवसायिक असून मिठाई व स्वीट होम दुकानदारांची संख्या किमान ६० आहे. याशिवाय इतर विविध व्यापारी संघटनांमधील जवळपास १०० व्यापारी मिळून एकूण सुमारे ४०० व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत या सर्वांना गॅस सिलेंडर मिळण्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की घरगुती गॅस सिलेंडर साधारणपणे २१ दिवसांत मिळू शकतो, परंतु व्यावसायिक वापरासाठी लागणारे सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हॉटेल आणि मिठाई व्यवसाय चालवणे कठीण होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास शहरातील अनेक हॉटेल व्यवसाय तसेच मिठाई दुकाने बंद ठेवावी लागू शकतात, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

याचा परिणाम केवळ व्यापाऱ्यांवरच नव्हे तर या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवरही होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. व्यवसाय बंद पडल्यास अनेक कामगारांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तातडीने लक्ष घालून बारामती शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी,अशी मागणी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Back to top button