बारामतीतील स्पीडब्रेकरच्या कामाच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त
“विकासकामे आवश्यक आहेत, मात्र ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,”

बारामतीतील स्पीडब्रेकरच्या कामाच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त
“विकासकामे आवश्यक आहेत, मात्र ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,”
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात सध्या विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे लोकप्रतिनिधी अजित पवार हे स्वतः पहाटे विकासकामांची पाहणी करताना अनेकदा दिसून आले आहेत.
त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र आहे. मात्र, काही कामांमधील दिरंगाईमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने बारामतीमध्ये विविध ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतीरोधक) बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम महत्त्वाचे असले तरी काही ठिकाणी ते अर्धवट अवस्थेतच अनेक महिन्यांपासून रखडले आहे.
विशेषतः इंदापूर रोडवरील स्पीड ब्रेकरचे काम अद्याप अंतिम टप्प्यात पूर्ण न झाल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अर्धवट तयार असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांचे संतुलन बिघडत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही नागरिक जखमीही झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हे स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्यामुळे धोका अधिक वाढतो आहे.
“विकासकामे आवश्यक आहेत, मात्र ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत,” अशी नागरिकांची मागणी आहे. संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून इंदापूर रोडवरील स्पीड ब्रेकरचे काम पूर्ण करावे, तसेच अपूर्ण कामांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






