
बारामतीतील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा जीबीएसमुळे मृत्यू
मृतांची संख्या १० वर पोहोचली.
बारामती वार्तापत्र
पुण्यात जीबीएसचा (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात मंगळवारी (दि.१८) जीबीएसमुळे किरण राजेंद्र देशमुख (वय २१, बारामती) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती तीन आठवड्यांपासून जीबीएसशी झुंज देत होती.
किरणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील जीबीएसमुळे एकूण मृतांची संख्या १० वर पोहोचली.
किरण ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मतदारसंघ आणि गृहनगर असलेल्या बारामती येथील रहिवासी होती. तिच्या शिक्षणासाठी ती पुण्यात सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. तेव्हा तिला हा आजार झाला. या भागात जीबीएसचे अनेक रुग्ण आढळले आहेत आणि दुर्दैवाने किरणलाही संसर्ग झाला होता. सुरुवातीला तिला अतिसार आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवली, ज्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिला बारामती येथे नेऊन तेथील डॉक्टरांकडे तिच्यावर उपचार सुरू केले.
बारामतीत काही काळ उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसत नव्हती. तिला ज्या प्रकारे त्रास होत होता त्या लक्षणांवरून डॉक्टरांना तिला जीबीएस असल्याचा संशय आला. परिणामी त्यांनी तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गेली तीन आठवडे किरणवर उपचार सुरू होते. मात्र, तिची जीबीएसशी झुंज अपयशी ठरली, अखेर मंगळवारी तिचा मृत्यू झाला.