बारामतीती मध्ये जनता कर्फ्यू कायम राहणार..?
व्यापाऱ्यांच्या कडव्या विरोधानंतर सात दिवसांनंतर फेरआढावा घेण्याचे जाहीर केले.
बारामतीती मध्ये जनता कर्फ्यू कायम राहणार..?
व्यापाऱ्यांच्या कडव्या विरोधानंतर सात दिवसांनंतर फेरआढावा घेण्याचे जाहीर केले.
बारामती : वार्तापत्र
बारामतीत प्रशासनाने १४ दिवसांच्या जनता कर्फ्यूची अधिसूचना प्रसिध्द केली, मात्र व्यापाऱ्यांच्या कडव्या विरोधानंतर सात दिवसांनंतर फेरआढावा घेण्याचे जाहीर केले. आज संध्याकाळी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. जनता कर्फ्यूनंतर कोरोनाच्या रुग्णांत आलेली घट लक्षात घेता कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अजूनही काही कालावधीची गरज आहे, त्यामुळे हा लॉकडाऊन पुढे कायम राहणार की उद्या बारामती उघडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
बारामतीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून वाढत राहीला आहे. सामूहिक संसर्गाचा वेग जोरात सुरू झाला असून कोरोनाचा गुणाकार सध्या सुरू आहे. मार्च ते ऑगस्ट अखेरपर्यंत बारामती व तालुक्यात सर्व मिळून १ हजार रुग्ण आढळले, तर २ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत एक हजार रुग्ण आढळले.
रुग्णांची संख्या १०० च्या वर जाऊ लागताच बारामतीत जनता कर्फ्यू लागू करण्याच्या मागणीस जोर आला. त्यानंतर दररोज १०० हून अधिक रुग्ण दिसू लागले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण ठेवायचे कोठे असा प्रश्नही प्रशासनास पडला. त्यानंतर प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला. मात्र शहरातील व्यावसायिकांनी त्यास विरोध केला. त्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन प्रशासनास सूचना केली व प्रशासनाने सात दिवसांत कोरोनाचा वेग कमी झाला, तर निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.
अजूनही दररोज ८० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आढळत आहेत. ही संख्याही काही कमी नाही. जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर मात्र सुरवातीच्या वेगात फरक पडला आहे. शहरातील रुग्णांच्या संख्येतही घट दिसू लागली आहे. त्यामुळे हा वेग आणखी नियंत्रणात आणण्यासाठी अजूनही वेळ हवा आहे, अन्यथा कोरोनाचा गुणाकार कायम राहीला, तर बारामती तालुका पाच हजारांचा आकडा याच महिन्यातही गाठेल अशी भीती काही जणांनी व्यक्त केली आहे.
या परिस्थितीत सध्याचा जनता कर्फ्यू सुरवातीस ठरल्यानुसार पुढील सातही दिवस पुढे कायम ठेवला जाण्याची चिन्हे अधिक आहेत. यासंदर्भात काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय प्रांताधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात चेंडू सोपवला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.