बारामतीत अदानी मीटरबाबत नागरिकांमध्ये भीती; गुपचूप मीटर बदलत असल्याचा आरोप
“आमच्या परवानगीशिवाय मीटर बदलले जात असतील तर पुढे बिल वाढले तर जबाबदारी कोणाची?”

बारामतीत अदानी मीटरबाबत नागरिकांमध्ये भीती; गुपचूप मीटर बदलत असल्याचा आरोप
“आमच्या परवानगीशिवाय मीटर बदलले जात असतील तर पुढे बिल वाढले तर जबाबदारी कोणाची?”
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात व परिसरात वीज मीटर बदलण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू असून, या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांत जुन्या वीज मीटरच्या जागी अदानी कंपनीचे नवे स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे दिसून येत आहे.
मात्र हे मीटर बसवताना ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता काम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बारामतीतील विविध अपार्टमेंट, सोसायट्या आणि व्यावसायिक इमारतींमध्ये साधारणपणे सर्व वीज मीटर एकाच ठिकाणी खाली बसवलेले असतात. अशा ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी येऊन जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवले असल्याचे अनेकांनी सांगितले. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत संबंधित ग्राहकांची परवानगी किंवा माहिती न घेता मीटर बदलले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे अनेक ग्राहकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, “आमच्या परवानगीशिवाय मीटर बदलले जात असतील तर पुढे बिल वाढले तर जबाबदारी कोणाची?” तसेच स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढण्याची शक्यता असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले होते की अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर राज्यात सक्तीने (कंपल्सरी) बसवले जाणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री स्तरावर अशी भूमिका मांडल्यानंतरही बारामतीत गुपचूप मीटर बदलले जात असल्याचा आरोप होत असल्याने या मोहिमेमागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्पष्ट माहिती देणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस देणे, त्यांची संमती घेणे आणि स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे आवश्यक असून, नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बारामतीकरांकडून होत आहे.






