स्थानिक

बारामतीत अवधुतनगर येथे झाडांची कत्तल;पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडे अचानकपणे तोडली जात

बारामतीत अवधुतनगर येथे झाडांची कत्तल;पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडे अचानकपणे तोडली जात

बारामती वार्तापत्र 

शहरातील अवधुतनगर परिसरात कॅनॉलच्या कडेला तसेच शेजारील भागातील निलगिरीच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याचे चित्र समोर आले असून या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बारामती नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या या भागात अनेक वर्षांपासून उभी असलेली झाडे अचानकपणे तोडली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अवधुतनगर परिसरातील कॅनॉलच्या कडेला असलेली निलगिरीची झाडे काही दिवसांपासून कापली जात आहेत. या झाडांमुळे परिसराला सावली मिळत होती तसेच पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत होती.

मात्र अचानकपणे झाडांची तोड सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. झाडे तोडण्यामागे नेमके कारण काय, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

बारामती शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहिमा राबवल्या होत्या. त्यांच्या पुढाकारामुळे शहरात विविध ठिकाणी हजारो झाडे लावण्यात आली होती.

त्यामुळे बारामती शहराला हरित शहर म्हणून ओळख निर्माण झाली होती. मात्र त्याच शहरात आता मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, शहरातील विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणे योग्य नाही. जर झाडे तोडणे अपरिहार्य असेल तर त्याऐवजी पर्यायी वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.

तसेच संबंधित प्रशासनाने झाडांची तोड करताना आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का,याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

दरम्यान,या प्रकरणात बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाडांची तोड नेमक्या कोणत्या कारणासाठी केली जात आहे, याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. झाडांची अंधाधुंद तोड थांबवून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा,अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Back to top button