इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाला यश?; प्रचारप्रमुख किरण गुजर
निवडणूक तब्बल १० वर्षांनी पार पडली आहे.

इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाला यश?; प्रचारप्रमुख किरण गुजर
निवडणूक तब्बल १० वर्षांनी पार पडली आहे.
बारामती वार्तापत्र
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत सभासदांनी जय भवानीमाता पॅनलला पसंती दिल्याचं पाहायला मिळत असून सर्व गटांमध्ये या पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. दरम्यान, लासुर्णे गटातून पृथ्वीराज जाचक आणि शरद जामदार यांचा विजय झाला असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल १० वर्षांनी पार पडली आहे. कारखान्याची सध्याची अवस्था लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील पाच वर्षे कारखान्याची धुरा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांसह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक यांच्यानेतृत्वात सर्वपक्षीय जय भवानीमाता पॅनलने ही निवडणूक लढवली.
तर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर यांच्या छत्रपती बचाव पॅनलने या निवडणुकीत सत्ताधारी गटाला आव्हान दिले होते. जय भवानी पॅनलकडून सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर उमेदवार देण्यात आले. तर छत्रपती बचाव पॅनलला सर्व जागांवर उमेदवारही देता आले नाहीत. काल या कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सकाळी बारामती येथील प्रशासकीय भवनात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
बारामतीमधील साखर कारखान्याच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. येथील निवडणुकासाठी रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत त्यांच्या गप्पा गोष्टीही महाराष्ट्राने या निवडणुकांच्या निमित्ताने पाहिल्या. आता, या निवडणुकांच्या निकालाचे कल हाती येत असून अजित पवारांच्या नेतृत्वाताली पॅनलचे सर्वच उमेदवार आगाडीवर असल्याची माहिती प्रचारप्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे. त्यामुळे, अजित पवार गटाच्या खांद्यावरच या निवडणुकांचा गुलाल पडणार असल्याचे दिसून येते.
मतदान केंद्रावर अजित पवार-हर्षवर्धन पाटलांची जुगलबंदी
अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले.
यावेळी मतदान केंद्रावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचे बघायला मिळाले. मतदानासाठी एकाच वेळी केंद्रावर पोहोचल्यानंतर अजित पवार म्हणाले, नमस्ते हर्षवर्धन पाटील साहेब… आम्ही संस्थेवर आहोत, मला माहितीच नाही. तर, हर्षवर्धन पाटील म्हणाले, शिक्के नीट मारले का? काही चुकलं नाही ना? असा प्रश्न विचारला. यावेळी दोघांनी मुक्तपणे संवाद साधला, दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेही या कारखान्याचे प्रतिनिधी आहेत.