बारामतीत एसटी बँकेच्या संचालकाला ₹४ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, इर्टिगा कार तसेच अन्य मुद्देमाल जप्त

बारामतीत एसटी बँकेच्या संचालकाला ₹४ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, इर्टिगा कार तसेच अन्य मुद्देमाल जप्त
बारामती वार्तापत्र
प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी ₹४ लाखांची लाच स्वीकारताना स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक तथा बारामती एमआयडीसी डेपो येथील वाहतूक नियंत्रक अनिल तुकाराम बनकर (वय ५१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), पुणे यांनी रंगेहात अटक केली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फर्निचर व्यवसायिक असून त्यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीसाठी सुमारे ₹४८.६० लाखांचे फर्निचरचे काम केले होते. त्यापैकी ₹४० लाखांची रक्कम अदा करण्यात आली होती. मात्र, ₹८.६० लाखांचे फर्निचर बिल आणि इतर कामांचे सुमारे ₹४.९८ लाखांचे बिल प्रलंबित होते. ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला ₹५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने एकूण ₹६ लाखांची मागणी करून तडजोडीअंती ₹४ लाख स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
त्यानुसार २३ जुलै रोजी एसीबीच्या पथकाने बारामती येथे सापळा रचला. बारामती एसटी बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावरील परिसरात आरोपीने आपल्या इर्टिगा कारमध्ये पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदाराकडून ₹४ लाखांची लाच स्वीकारताच एसीबीने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान ₹४ लाखांची लाचेची रक्कम, मोबाईल फोन, गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, इर्टिगा कार तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे हे करीत आहेत. तपासाच्या हिताच्या दृष्टीने ध्वनिमुद्रित संभाषणे, पंचनामे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य संवेदनशील तपशील सध्या जाहीर करण्यात आलेले नाहीत.







