राजकीय

बारामतीत ऐन निवडणुकांच्या काळात अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाचा पैसे मोजतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल!

जय पाटील यांनी आरोप फेटाळला

बारामतीत ऐन निवडणुकांच्या काळात अजित पवार गटाच्या शहराध्यक्षाचा पैसे मोजतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल!

जय पाटील यांनी आरोप फेटाळला

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारा एक कथित व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे बारामती शहराध्यक्ष जय पाटील हे पैशांनी भरलेल्या बॅगेतून पैसे मोजताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर व्हिडीओ व्हायरल

बारामती नगर परिषदेची निवडणूक २० जानेवारी रोजी होत असून १८ जानेवारी रोजी प्रचाराची अधिकृत सांगता झाली. नेमक्याच याच दिवशी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात संशय, चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विरोधकांकडून हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

व्हिडीओ AI द्वारे तयार – जय पाटील यांचा दावा

या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना शहराध्यक्ष जय पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की,
हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवण्यात आला असून तो पूर्णपणे खोटा व बदनामीकारक आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशीच विरोधकांनी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच या प्रकरणी आपण बारामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
“मतदानाआधीच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून असे हतबल प्रयत्न केले जात आहेत,” असेही जय पाटील म्हणाले.

शरद पवार गटाचा गंभीर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाकडून निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
तेव्हा अजित पवार गटाने हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र आता व्हायरल व्हिडीओमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या पक्षावर जोरदार टीका केली जात आहे.

अपक्ष उमेदवाराचा आरोप

या प्रकरणाला आणखी वेगळे वळण देत, अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोसिन पठाण यांनी जय पाटील यांचा पैसे मोजतानाचा व्हिडीओ असल्याचा थेट आरोप केला आहे. यामुळे बारामतीत राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

निवडणुकीच्या ऐन तोंडावर व्हायरल झालेल्या या कथित AI व्हिडीओमुळे बारामतीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. व्हिडीओची सत्यता तपासणे आता पोलीस आणि तपास यंत्रणांवर अवलंबून असून, याचा निवडणुकीवर किती परिणाम होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Back to top button