बारामतीत कथित हनी-ट्रॅप प्रकरणांमुळे खळबळ; कारवाईची मागणी
अनेक घटना अजून उघडकीस आलेल्या नाहीत

बारामतीत कथित हनी-ट्रॅप प्रकरणांमुळे खळबळ; कारवाईची मागणी
अनेक घटना अजून उघडकीस आलेल्या नाहीत
बारामती वार्तापत्र
बारामती हे शिक्षणाचे केंद्र आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखले जाणारे शहर म्हणून परिचित आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून बारामती परिसरात कथित हनी-ट्रॅप व ब्लॅकमेलिंगच्या घटनांबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील काही नामांकित लॉज आणि परिसरात बाहेरगावाहून आणलेल्या महिलांच्या माध्यमातून काही व्यक्तींना टार्गेट केले जात असल्याचे आरोप होत आहेत. या महिला दिवसा शहरात वावरून विशिष्ट व्यक्तींशी ओळख वाढवतात, प्रेमसंबंध निर्माण करतात आणि नंतर त्यांना लॉज किंवा फ्लॅटमध्ये नेऊन व्हिडिओ चित्रीकरण करून ब्लॅकमेल केल्याचे कथित प्रकार समोर येत असल्याची चर्चा आहे.
या कथित प्रकरणांमध्ये काही लॉज माजी अधिकारी किंवा राजकीय कार्यकर्त्यांशी संबंधित असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप,तसेच एमआयडीसी, भिगवण रोड व इतर भागांतील फ्लॅटमध्ये कोणतीही वैध कागदपत्रे (आधारकार्ड, भाडेकरार) नसताना महिलांना ठेवले जात असल्याचे दावे,
आणि अनेक व्यापारी व नागरिक या हनी-ट्रॅपमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणांपैकी अनेक घटना अजून उघडकीस आलेल्या नाहीत, तसेच पीडित व्यक्ती बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचेही बोलले जात आहे. यामुळे अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे चालना मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, लॉज, फ्लॅट आणि बाहेरगावाहून आणलेल्या महिलांची सखोल तपासणी करावी, तसेच कायदेशीर कागदपत्रांशिवाय राहणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पुढाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या बाबीकडे लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बारामतीची सामाजिक प्रतिमा आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.






