आपला जिल्हा

बारामतीत कमर्शिअल गॅस टाक्यांचा तुटवडा;घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांचा डल्ला?

शहरात काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात

बारामतीत कमर्शिअल गॅस टाक्यांचा तुटवडा;घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांचा डल्ला?

शहरात काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात

बारामती वार्तापत्र

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बारामती शहरात सध्या कमर्शिअल गॅस टाक्यांचा पुरवठा कमी झाल्याची चर्चा असून त्याचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे काहीजण सांगत आहेत. विशेषतः अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन व गॅस बाजारावर होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यामुळे काही व्यावसायिकांनी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. हॉटेल, ढाबे, खाद्यपदार्थ विक्रेते आणि काही लहान उद्योगांमध्ये घरगुती सिलिंडर वापरले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

यामुळे घरगुती ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा आरोपही काही ठिकाणी केला जात आहे.बारामतीमध्ये गॅस वितरांकडे आज नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान,अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग केल्यानंतर लगेच सिलिंडर मिळत नसल्याचा अनुभव येत आहे. काहींना 21 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच गॅस मिळेल असा संदेश संबंधित कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरून मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

तथापि, गॅस वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना घाबरून जाण्याची किंवा वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी करण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. नियमानुसार ठराविक कालावधीनंतर सर्व ग्राहकांना गॅस उपलब्ध करून दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याची चर्चा होत आहे. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा तपासणी करण्यासाठी कोणतेही विशेष पथक सक्रिय नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे घरगुती गॅसवर व्यावसायिकांचा डल्ला वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट माहिती समोर येणे गरजेचे असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच घरगुती ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त होत आहे.

Back to top button