बारामतीत कामगार न्यायालय सुरू करण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी – धनंजय जामदार
असंघटित व इतर कामगारांची संख्या देखील मोठी आहे

बारामतीत कामगार न्यायालय सुरू करण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी – धनंजय जामदार
असंघटित व इतर कामगारांची संख्या देखील मोठी आहे
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी सह परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असून कामगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कामगार न्यायालय बारामती मध्येच स्थापन करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली. अजितदादा पवार यांना सहयोग निवास्थानी याविषयी निवेदन देताना कार्यकारणी सदस्य खंडूजी गायकवाड, संभाजी माने , महादेव गायकवाड व रियल डेअरीचे मनोज तुपे उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले बारामती तालुक्यात पन्नास हजाराहून अधिक नोंदणीकृत कामगारांची संख्या आहे. असंघटित व इतर कामगारांची संख्या देखील मोठी आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच कंपन्या व कामगारांमध्ये न्यायालयीन दावे दाखल करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कामगार न्यायालय पुण्यात असलेने कंपन्या व कामगारांना लहान मोठ्या न्यायालयीन कामासाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. यामध्ये वेळ पैसा वाया जात असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाठपुरावा कमी पडल्यास अनेकदा न्याय मिळण्यास विलंब होतो अथवा न्यायापासून वंचित रहावे लागते यासाठी बारामतीमध्येच कामगार न्यायालय सुरू करणे आवश्यक असल्याचे धनंजय जामदार यांनी सांगितले.
बारामती मध्ये कामगार न्यायालय स्थापन केल्यास बारामती सह इंदापूर दौंड पुरंदर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व हजारो कामगारांना बारामती या मध्यवर्ती ठिकाणी न्यायालयीन सुविधा उपलब्ध होईल. याबरोबरच पुण्यातील कामगार न्यायालया वरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन जलदगतीने प्रकरणे मार्गी लागतील असेही धनंजय जामदार यांनी सांगितले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने कामगार न्यायालय बारामती येथे स्थापना करण्याच्या मागणीबाबत आपण सकारात्मक आहोत. या प्रस्तावावर मंत्रालय स्तरावर योग्य तो विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शिष्यमंडळाला दिली.