
बारामतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन..
सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी…..
बारामती वार्तापत्र
बारामती- महाविकास आघाडी सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहरातील भिगवण चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित जमून सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन केले.
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करूनही संपूर्ण कर्जमाफी दिली नाही. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा करण्याची घोषणा करून ही सदरची रक्कम जमा केली नाही. शेतकऱ्यांच्या शेती व घरगुती विजेची जोडणी तोडली. बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन बंद केले.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्याने होणारा पाझर बंद होऊन अनेक विहिरी व बोअर कोरडे पडून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. या मुद्द्यांवरून आज भाजपच्या वतीने सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खंडणीखोर सरकारचा निषेध असो, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, राष्ट्रपती राजवट झालीच पाहिजे.अशा घोषणा देत ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेचे दहन करून पायदळी तुडविण्यात आले.दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.