बारामतीत ‘जीव घेणारी’ होर्डिंग्स पुन्हा झळकली; प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
होर्डिंग्सना कोणाचा पाठिंबा आहे

बारामतीत ‘जीव घेणारी’ होर्डिंग्स पुन्हा झळकली; प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
होर्डिंग्सना कोणाचा पाठिंबा आहे
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद हद्दीत काही महिन्यांपूर्वी मोठ्या धोकादायक होर्डिंग्सविरोधात प्रशासनाने मोहीम राबवत त्या काढून टाकल्या होत्या. पुण्यात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली होती.
मात्र नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारची मोठी होर्डिंग्स शहरात दिसू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही नागरिकांच्या मते, पूर्वी काढून टाकण्यात आलेल्या होर्डिंग्सपैकी काही पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यात आल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. या होर्डिंग्सवर काही नगरसेवकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे फोटो किंवा राजकीय प्रचाराचे संदेश झळकत असल्याचेही बोलले जात आहे.
त्यामुळे या होर्डिंग्सना कोणाचा पाठिंबा आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
विशेष म्हणजे, प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कारवाईदरम्यान लाखो रुपयांचा खर्च झाल्याची माहिती त्या वेळी समोर आली होती.
मोठ्या यंत्रणेद्वारे आणि मनुष्यबळ लावून ही होर्डिंग्स काढण्यात आली होती. या कारवाईची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांमध्येही प्रसिद्ध झाली होती. मात्र आता त्याच प्रकारची होर्डिंग्स पुन्हा दिसू लागल्याने प्रशासनाच्या त्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“पूर्वी होर्डिंग्स काढण्याचा निर्णय योग्य होता का, की आता पुन्हा लावली जात असलेली होर्डिंग्स बेकायदेशीर आहेत?” असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. तसेच कोणत्या नेत्याच्या किंवा राजकीय दबावामुळे या होर्डिंग्सना पुन्हा परवानगी मिळाली, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शहरात मोठ्या आकाराची आणि नियमबाह्य होर्डिंग्स लावल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. वादळ, पावसाळा किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी अशा होर्डिंग्स कोसळल्यास जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे बारामती नगर परिषद प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






