बारामतीत ठेकेदारांची मनमानी डिव्हायडरमध्ये विनापरवानगी तयार होणाऱ्या ‘एंट्री-एग्झिट’ मार्गामुळे नागरिकांमध्ये संताप
वाहनचालकांसाठी गंभीर धोका

बारामतीत ठेकेदारांची मनमानी डिव्हायडरमध्ये विनापरवानगी तयार होणाऱ्या ‘एंट्री-एग्झिट’ मार्गामुळे नागरिकांमध्ये संताप!
वाहनचालकांसाठी गंभीर धोका
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळत आहे. त्याच पद्धतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर डिव्हायडर बांधणी, सुशोभीकरण, वृक्षारोपण, विद्युत पोल उभारणी अशी अनेक कामे सध्या जलदगतीने सुरू आहेत.
शहराच्या सौंदर्यात आणि वाहतुकीच्या शिस्तीत वाढ व्हावी या उद्देशाने ही कामे होत असली तरी त्याचबरोबर काही ठेकेदारांकडून गंभीर मनमानी देखील होत असल्याचे समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या डिव्हायडरमध्ये विनापरवानगी ‘कट’ किंवा एंट्री-एग्झिट पॉइंट तयार केले जात आहेत. कथितपणे, काही ठेकेदार आपले व्यक्तिगत संपर्क, ओळखीतील लोक किंवा माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरून हे ‘विशेष रस्ते’ तयार करत असल्याचे आरोप होत आहेत.
या अवैध ठेवलेल्या एंट्रीमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण होत आहे.अचानक उघडणारे मार्ग,वर्दळीतील ठिकाणी तयार केलेले अयोग्य कट,यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.त्याचबरोबर वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी वाढते आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, या सर्व प्रकाराकडे बारामती नगर परिषदेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही तपासणी, कारवाई किंवा नियमांचे पालन तपासले जात नसल्याने ठेकेदारांची मनमानी अधिकच वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
सध्या बारामतीमध्ये विकासकामांची मोठी चळवळ सुरू असताना, अशा प्रकारच्या अनियमिततेकडे त्वरित लक्ष देऊन कडक कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






