स्थानिक

बारामतीत डॉक्टर–मेडिकल साखळीवर प्रश्नचिन्ह?; चौकशीची मागणी

शहरात वैद्यकीय क्षेत्रात नियंत्रणाचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण

बारामतीत डॉक्टर–मेडिकल साखळीवर प्रश्नचिन्ह?; चौकशीची मागणी

शहरात वैद्यकीय क्षेत्रात नियंत्रणाचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण

बारामती वार्तापत्र

शहरातील वैद्यकीय क्षेत्राबाबत धक्कादायक आरोप समोर येत असून काही डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. उपचारांच्या नावाखाली मनमानी शुल्क आकारले जात असून औषधांच्या विक्रीतही संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

माहितीनुसार, अनेक डॉक्टरांकडून रुग्णांना विशिष्ट मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे घेण्यास भाग पाडले जाते. या औषधांचा इतर मेडिकलमध्ये सहज उपलब्ध न होणे, हा एक नियोजित प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना पर्याय न राहता महागड्या दरातच औषधे घ्यावी लागत असल्याने त्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

यासोबतच बारामतीतील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रक (रेट कार्ड) स्पष्टपणे लावलेले नसल्याचेही निदर्शनास येत आहे. ओपीडी शुल्क, ऑपरेशनचे खर्च, बेड चार्जेस तसेच इतर वैद्यकीय सेवा याबाबत कोणतीही पारदर्शकता नसून रुग्णांकडून मनमानी दर आकारले जात असल्याची तक्रार आहे. राज्य शासनाने घालून दिलेले नियम व अटींचे पालन अनेक ठिकाणी होत नसल्याचेही बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण आरोग्य योजनांमध्येही गैरप्रकार होत असल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना योजनांचा पूर्ण लाभ न देता फसवणूक केली जात असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औषध विक्रीतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असताना, सवलतीत औषधे देणाऱ्या काही नामांकित मेडिकल स्टोअर्समध्ये विशिष्ट हॉस्पिटलची औषधे उपलब्ध नसतात. कारण, जर त्या मेडिकलने अशी औषधे ठेवण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित डॉक्टरांकडून औषधांची नावे बदलली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या दुकानांमध्ये औषधांचा साठा पडून राहून नुकसान होत असल्याचेही समोर आले आहे.

बारामतीतील बारामती खरेदी विक्री संघ, वेलनेस मेडिकल व मेडप्लस मेडिकल या तीन मेडिकल मध्ये सवलत दिले जात असल्यामुळे याचा कडे नागरिकांचा ओढा असतो पण ह्या मेडिकल मध्ये ठराविक औषधे सोडले तर इतर कुठलेही हॉस्पिटलची औषधे इथे मिळत नसल्यामुळे यांची देखील नाचक्की होत असल्याचे बोलले जात आहे

या सर्व प्रकारामुळे बारामतीतील वैद्यकीय क्षेत्रात नियंत्रणाचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Back to top button