बारामतीत धनगर समाज vs अजित पवार रुग्णालय वाद!;अन्यथा राज्यभर गावागावांत मोठे जनआंदोलन उभारणार – लक्ष्मण हाके
काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा.

बारामतीत धनगर समाज vs अजित पवार रुग्णालय वाद!;अन्यथा राज्यभर गावागावांत मोठे जनआंदोलन उभारणार – लक्ष्मण हाके
काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा.
बारामती वार्तापत्र
महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावात बदल करण्याच्या हालचालींच्या निषेधार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह कार्यकर्त्यांनी बारामतीत धरणे आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नावाबाबत काढलेल्या जीआरमध्ये तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्या नावात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच त्याच्या निषेधार्थ आम्ही एकत्र आलो आहोत.
“अजितदादांच्या नावाने इतर कोणत्याही संस्थेला नामकरण करायचे असेल तर आमचा विरोध नाही. मात्र अहिल्यादेवी होळकर यांच्या नावात छेडछाड करण्याचा प्रयत्न कोणाच्या डोक्यातून आला आहे, याचा शोध घेण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाला इशारा
हाके यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, या संदर्भात काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा. शिंदे आणि फडणवीस सरकारने ज्या निर्णयानुसार महाविद्यालय व स्वरोपचार रुग्णालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले होते, त्यात कोणताही बदल होता कामा नये.
काही पुढारी सर्वोच्च रुग्णालयाला वेगळे नाव देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याचे सांगत त्यांनी याला विरोध दर्शवला. “हे नाव का काढून टाकायचे? अजितदादांचे नाव द्यायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्रासारख्या इतर संस्थांना द्या, आम्ही त्याचे स्वागत करू. पण आधीच दिलेल्या नावात बदल करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
पत्रकार परिषद घेणाऱ्यांवर टीका
या विषयावर पत्रकार परिषद घेणाऱ्या काही नेत्यांवरही त्यांनी टीका केली. “महाविद्यालय आणि रुग्णालय प्रत्यक्ष पाहावे. त्याला एकच नाव आहे. राजकारणात काम करताना किती गुलामी करायची? पदांसाठी पत्रकार परिषद घेऊन चुकीचे समर्थन करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
‘जीआरमागे कोण?’
या निर्णयामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेणार असल्याचे सांगत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “या जीआरच्या मागे नक्की कोण आहे? कोण झारीतील शुक्राचार्य आहे? कोण कळीचा नारद आहे? नावाबाबत राजकारण करू नका. आम्ही नेहमीच तुम्हाला साथ दिली आहे, अर्थ तुम्ही म्हणाल तोच कायदा असा होत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची पुढील दिशा
हाके यांनी सांगितले की, आठवड्याभरात हा जीआर रद्द करून महाविद्यालयाबरोबरच शासकीय रुग्णालयालाही अहिल्यादेवी होळकर यांचे नाव कायम ठेवण्याबाबत दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा राज्यभर गावागावांत मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल.
“ज्यांना आकड्यांची भाषा समजते त्यांना येत्या काळात आमची ताकद दाखवून देऊ,”असा इशाराही त्यांनी दिला.






