बारामतीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
नगरपरिषद निवडणुकीनंतर अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

बारामतीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
नगरपरिषद निवडणुकीनंतर अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत पारंपरिक विरोधकांसह काही अंतर्गत गटांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, पक्षात असलेल्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचे आरोप पुढे येत आहेत.
निवडणूक प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी “आम्हाला एक मत, त्यांना एक मत” अशा प्रकारचा प्रचार केल्याचे नागरिक उघडपणे सांगत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे ही निवडणूक केवळ विरोधकांमुळे नव्हे, तर अंतर्गत पक्षविरोधी कामामुळे अडचणीत आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार काय निर्णय घेणार?
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे आपल्या कडक आणि स्पष्ट निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यामुळे पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, की त्यांना समज देऊन पुन्हा पक्षात सामावून घेतले जाणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.तसेच, निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या किंवा स्वतंत्रपणे निवडून आलेल्या लोकांना भविष्यात पक्षात प्रवेश दिला जाणार का, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे संघटना मजबूत ठेवण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
आगामी निवडणुकांचा परिणाम?
येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत आहे. जर अशा प्रकारचे पक्षविरोधी काम पुन्हा समोर आले, तर पक्षाला भविष्यात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. माळेगाव–बारामती परिसरात यापूर्वीही अंतर्गत विरोधामुळे अडचणी निर्माण झाल्याची उदाहरणे दिली जात आहेत.
काही कार्यकर्ते पाठीमागून विरोधकांना मदत करत असल्याचे चित्र समोर येत असल्याने पक्ष नेतृत्वाने यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची, याचेही विश्लेषण सुरू आहे.
एकूणच, बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत मतभेद, पक्षविरोधी काम आणि त्यावर होणारी संभाव्य कारवाई यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार यांचा पुढील निर्णय केवळ बारामतीपुरता मर्यादित न राहता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे “अजितदादा काय भूमिका घेणार?” याकडे बारामतीकरांसह संपूर्ण राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.






