बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू;प्रतिभा पवारांनी झळकावला ‘जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय’ अशा आशयाचं बॅनर
आता नातवाचा इतका पुळका का आलाय
बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू;प्रतिभा पवारांनी झळकावला ‘जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय’ अशा आशयाचं बॅनर
आता नातवाचा इतका पुळका का आलाय
बारामती वार्तापत्र
राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागल्याचं दिसतंय. शरद पवारांची आणि अजित पवारांची शेवटची सभा ही बारातमीमध्येच होत असून त्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापल्याचं दिसलंय.
शरद पवार हे युगेंद्र पवारांसाठी शेवटची सभा घेत असून त्या सभेत एका गोष्टीने मात्र महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या त्या सभेला प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या आणि त्यांनी एक बॅनरही झळकावला. ‘जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय’ अशा आशयाचं बॅनर प्रतिभा पवारांनी झळकावलं आणि कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं.
प्रतिभा पवारांच्या हातात बॅनर झळकला
बारामतीच्या निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार चर्चेत आल्या आहेत. आधी अजितदादांनी त्यांची जाहीर तक्रार केली. प्रतिभाकाकी या आधी कधी कुणाच्या प्रचारात आल्या नाहीत. आता नातवाचा इतका पुळका का आलाय असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवण्यात आल्याची घटनाही घडली. त्यानंतर आता प्रतिभा पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीच्या शेवटच्या सभेत हजेरी लावली. नुसताच त्या ठिकाणी हजेरी लावली नाही तर त्यांनी युगेंद्र परवा यांना आशीर्वाद दिला.
यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातामध्ये एक बॅनर असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. ‘जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय…’ असं त्या बॅनरवर लिहिल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी शेवटच्या टप्प्यात सभांचा जो काही धडाका लावलाय त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची उर्जा निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू
बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा लागली आहे. बारामतीमधील ही लढाई ही आता राजकीय उरली नसून ती कुटुंबात पडलेली फूट असल्याचं उघड दिसतंय. याची सुरवात लोकसभेला झाली. अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. मतदानापर्यंत धाकधूक लागून असलेल्या लढाईल मतदारांनी त्यांच्या मताचं दान मात्र शरद पवारांनाच दिलं आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या. खुद्द बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 47 हजाराहून अधिक मताधिक्य मिळालं.
पवारांच्या कुटुंबातील लढाईचा आता दुसरा अंक सुरू झाला असून विधानसभेच्या निमित्ताने अजित पवारांना त्यांच्या पुतण्याने, युगेंद्र पवारांनी आव्हान दिलंय. मी लोकसभेला चूक केली होती, सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी दिली अशी कबुली अजित पवारांनी दिली. त्याचवेळी आता ही चूक तुम्ही करू नका असं आवाहन अजित पवारांनी शरद पवारांना केलं होतं. पण शरद पवारांनी त्यांच्या नातवालाच, युगेंद्र पवारांनाच अजित पवारांच्या विरोधात उभं केलं.