क्राईम रिपोर्ट

बारामतीत पहाटे पोलिसांचा सापळा! सावत्र बहिणीचे घर जाळणारा ‘बिट्या’ जेरबंद

पहाटे घराजवळ पोलिसांचा सापळा; रेकॉर्डवरील राकेश उर्फ बिट्या गायकवाडला शिताफीने ताब्यात घेतले

बारामतीत पहाटे पोलिसांचा सापळा! सावत्र बहिणीचे घर जाळणारा ‘बिट्या’ जेरबंद

पहाटे घराजवळ पोलिसांचा सापळा; रेकॉर्डवरील राकेश उर्फ बिट्या गायकवाडला शिताफीने ताब्यात घेतले

बारामती वार्तापत्र 

सावत्र बहिणीच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याच्या गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला तसेच न्यायालयीन वॉरंट प्रलंबित असलेला राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला बारामती शहर पोलिसांनी पहाटे नियोजनबद्ध सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची जेल कस्टडी सुनावली.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. 350/2026 मधील भारतीय न्याय संहिता कलम 326(g), 351(1), 351(2), 352 अन्वयेच्या गुन्ह्यात गायकवाड हा पाहिजे आरोपी होता. उपलब्ध माहितीनुसार, सावत्र बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीत घर जाळपोळ, धमकी आणि संबंधित गंभीर कृत्यांचे आरोप आहेत.

दरम्यान, आरोपीविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक 2, बारामती यांच्या न्यायालयातील RCC क्र. 457/2020 मध्येही वॉरंट प्रलंबित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याशिवाय त्याच्याविरुद्ध पूर्वीच्या विविध गुन्ह्यांच्या अनुषंगानेही न्यायालयीन कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहाटेची गोपनीय खबर अन् पोलिसांचा सापळा

आरोपी पहाटे आपल्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागल्यास तो पुन्हा पसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने परिसरात सापळा लावला.

पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे आणि महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने योग्य वेळ साधत आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले.

पूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद

पोलिसांच्या माहितीनुसार, राकेश उर्फ बिट्या गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही खंडणी, मारहाण, धमकी, घरात घुसणे, महिलेशी संबंधित गुन्हे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सध्याच्या जाळपोळीच्या प्रकरणात त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईसाठीही कायदेशीर परीक्षण

आरोपीच्या पूर्वगुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि सध्याच्या प्रकरणाचा विचार करून पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी कायदेशीर परीक्षण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कायद्यातील आवश्यक निकष पूर्ण झाल्यास लागू प्रतिबंधात्मक तरतुदींनुसार सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

“गुन्हा करून कितीही दिवस लपून राहिले तरी कायद्यापासून सुटका नाही. रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींवर पोलिसांची करडी नजर आहे,” असा स्पष्ट संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Back to top button