स्थानिक

बारामतीत पोलिसांचा ‘सरप्राईज चेक’! नो-पार्किंग, नंबर प्लेट, लायसन्ससह ९२ कारवाया;₹६६ हजारांचा दंड

“नाकाबंदी कुठे होणार सांगणार नाही; नियम मोडला तर कारवाई ठरलेली!”

बारामतीत पोलिसांचा ‘सरप्राईज चेक’! नो-पार्किंग, नंबर प्लेट, लायसन्ससह ९२ कारवाया;₹६६ हजारांचा दंड!

“नाकाबंदी कुठे होणार सांगणार नाही; नियम मोडला तर कारवाई ठरलेली!”

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी बारामती शहर पोलीस व वाहतूक शाखेने फलटण चौकात संयुक्त धडक नाकाबंदी राबवली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईत अवघ्या तीन तासांत ९२ वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ६६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत फलटण चौक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, १० पोलीस अंमलदार व एक आरसीपी पथक तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

🔥 नंबर प्लेटपासून नो-पार्किंगपर्यंत कारवाई

कारवाईमध्ये तुटलेल्या नंबर प्लेटच्या तब्बल ३२ वाहनांवर ₹२३,५००, तर नो-पार्किंगच्या २६ वाहनांवर ₹१४ हजारांचा दंड करण्यात आला. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या १२ वाहनचालकांवर ₹१० हजारांची कारवाई करण्यात आली.

याशिवाय ट्रिपल सीटच्या ३, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १, काळी काच असलेल्या ३, वाहनात अनधिकृत बदल केलेल्या ३ तसेच इतर नियमभंगाच्या प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली.

🏍️ कर्कश सायलन्सरच्या बुलेटवर पोलिसांची नजर!

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलन्सरवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. अशा वाहनांवर ७ कारवाया करण्यात आल्या. अनधिकृत फेरबदल करून मोठा आवाज करणाऱ्या वाहनांमुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन अशा वाहनांवर यापुढेही कारवाई केली जाणार आहे.

👮‍♂️ “नाकाबंदीची जागा आधी सांगितली जाणार नाही!”

उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘Joint Enforcement + Visible Policing + Surprise Checking’ या पद्धतीवर भर देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या चौकांमध्ये अचानक वाहन तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे “नाकाबंदीची जागा आधी सांगितली जाणार नाही; नियमभंग आढळल्यास कारवाई मात्र निश्चित असेल,” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, शैक्षणिक संस्था परिसर, मुख्य रस्ते आणि संवेदनशील भागांत अशा अचानक तपासण्या यापुढेही सुरू राहणार आहेत.

⚠️ दंड नव्हे, अपघात रोखणे हे मुख्य उद्दिष्ट

पोलिसांनी स्पष्ट केले की, या मोहिमेचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून बेदरकार वाहनचालकांना आळा घालणे, अपघात रोखणे आणि रस्त्यावरील शिस्त वाढवणे हा आहे.

वाहनचालकांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, नंबर प्लेट नियमानुसार असावी, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट प्रवास टाळावा तसेच कर्कश सायलन्सर व नियमबाह्य फेरबदल करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

“पोलीस दिसले पाहिजेत—नियम पाळले गेले पाहिजेत—नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे,” या भूमिकेतून बारामती पोलिसांची धडक कारवाई सुरूच राहणार आहे.

Back to top button