बारामतीत प्रशासन ॲक्शन मोडवर;अवजड वाहतुकीला दिवसा चारच तास परवानगी
सर्वांचे म्हणणे ऐकून प्रशासनाने मंगळवारपासून (ता. २६) नवीन आदेश जारी केले.

बारामतीत प्रशासन ॲक्शन मोडवर;अवजड वाहतुकीला दिवसा चारच तास परवानगी
सर्वांचे म्हणणे ऐकून प्रशासनाने मंगळवारपासून (ता. २६) नवीन आदेश जारी केले.
बारामती वार्तापत्र
शहरातील बांधकाम साहित्याच्या ट्रक, डंपर, टिपर, हायवा या सारख्या अवजड वाहनांना दुपारी १२ ते चार वाजेपर्यंत चार तास वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय बारामतीतील प्रशासनाने घेतला आहे.
सकाळी सात ते १२ व दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत या वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक करता येणार नाही, असा आदेश बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जारी केला आहे. बारामतीतील खंडोबानगरच्या चौकात झालेल्या अपघातात वडील व दोन मुलींचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर बारामतीचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीमध्ये अनेक बदल केले आहेत.
शहरात अवजड वाहनांच्या वाहतूकीवर निर्बंध आणण्याची नागरिकांची प्रमुख मागणी होती. त्यानुसार प्रशासनाने असे निर्बंध आणले. त्यानंतर अवजड वाहन मालक व चालकांनी हे निर्बंध उठविण्याची मागणी केली होती. याबाबत प्रशासकीय स्तरावर एक बैठक झाली. या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून प्रशासनाने मंगळवारपासून (ता. २६) नवीन आदेश जारी केले.
या आदेशानुसार खडी, क्रश, सेंड, वाळू, माती, मुरूम यांची वाहतूक करणारे चार ब्रास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेले ट्रक, हायवा, टिपर, डंपर अशा वाहनांना शहर हद्दीतील सम्यक चौक, महात्मा फुले चौक, खंडोबानगर चौक, सातव, गुणवडी चौक, गांधी चौक, फलटण चौक, वाबळे हॉस्पिटल चौक, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बस स्थानक, मोतीबाग चौक, कोर्ट कॉर्नर, सिटी ईन चौक, पेन्सिल चौकामधून व परिसरात सोमवार ते शनिवार सकाळी सात ते दुपारी १२ व दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत बंदी असेल. दुपारी १२ ते चार या वेळेतच ही वाहतूक करता येईल.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देत या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीला बंदी घातली पाहिजे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे नावडकर यांना केली आहे.