बारामतीत फेरफारासाठी नागरिकांना घालावे लागतात हेलपाटे,प्रशासकीय कारभारात गोंधळ,अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार
“कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत”

बारामतीत फेरफारासाठी नागरिकांना घालावे लागतात हेलपाटे,प्रशासकीय कारभारात गोंधळ,अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार
“कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत”
बारामती वार्तापत्र
बारामती तहसील कार्यालयातील फेरफार विभागाच्या कारभाराबाबत गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत. जमिनीच्या फेरफार नोंदींसाठी सामान्य नागरिकांना अक्षरशः कार्यालयाचे चक्र मारावे लागत असताना,काही ठराविक लोकांना मात्र कार्यालयात थेट प्रवेश देऊन प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
बारामतीतील फेरफार कार्यालयात काही कामे थेट देवाणघेवाणीतून, संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून किंवा एजंटमार्फत आलेल्या लोकांसाठी झटपट केली जात असल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र “कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत”असे कारण सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे,तहसील कार्यालयातील कर्मचारी बाहेर निवडणूक कामासाठी नियुक्त असल्याचे सांगितले जात असले तरी बारामती वार्ता या वृत्तपत्राच्या कॅमेऱ्याने कार्यालयात प्रत्यक्ष पाहणी केली असता, काही कर्मचारी आत बसून फेरफार तपासणीचे काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे प्रशासनाच्या म्हणण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या फेरफारांची तपासणी नेमकी कोणासाठी सुरू होती? कोणाला ते फेरफार देण्यासाठी काढले जात होते? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकाराबाबत खुद्द तहसीलदारांनाही अंधारात ठेवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
तहसीलदारांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संबंधित कर्मचारी त्यांच्या निवडणुकीच्या कामात आहेत.ते फेरफारच्या ऑफिसमध्ये कामावर रुजू राहण्यास उद्या सांगू असे सांगण्यात आले आहे.” मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आल्याने तहसीलदारांकडेही अपुरी किंवा चुकीची माहिती दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकारामुळे बारामती तहसील कार्यालयातील प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सामान्य नागरिकांचे काम प्रलंबित ठेवून काही विशिष्ट लोकांना प्राधान्य दिले जात असेल, तर तो प्रशासनावरचा गंभीर आरोप ठरतो. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.






