क्राईम रिपोर्ट

बारामतीत फेरफार काढण्यासाठी मोजावे लागतात पैसे? कर्मचाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ बारामती वार्तापत्रच्या हाती

काम वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण

बारामतीत फेरफार काढण्यासाठी मोजावे लागतात पैसे? कर्मचाऱ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ बारामती वार्तापत्रच्या हाती

काम वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील प्रशासकीय भवनात महसूल विभागातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रेकॉर्ड रूममध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ बारामती वार्तापत्रच्या प्रतिनिधीने रेकॉर्ड केला आहे.याची नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित फेरफार आणि इतर महसुली कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, अनेक नागरिकांना तासन्‌तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार वारंवार केली जाते. काम वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान महसूल शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी अजय जायपत्रे हे त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवर अनुपस्थित असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित नागरिकांनी शोध घेतला असता ते प्रशासकीय भवनातील रेकॉर्ड रूममध्ये असल्याचे दिसून आले.

रेकॉर्ड रूममध्ये गेल्यानंतर काही कर्मचारी आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. या व्हिडिओमुळे महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, प्रशासकीय भवनातील काही कर्मचाऱ्यांना रेकॉर्ड रूममध्ये वारंवार जाताना पाहिले जाते, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे रेकॉर्ड रूम ही केवळ कागदपत्रे ठेवण्याची जागा आहे की इतर काही व्यवहारांसाठी वापरली जाते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे बारामतीतील प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आता संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या व्हिडिओमुळे प्रशासकीय भवनातील कामकाजावर पुन्हा एकदा पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून सत्य परिस्थिती नागरिकांसमोर आणावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button