स्थानिक

बारामतीत बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप

उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

बारामतीत बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप

उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

बारामती वार्तापत्र 

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसर, भिगवण रोड येथे पारितोषिक वितरण करून या टप्प्याचा समारोप करण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत असून नामवंत खेळाडूंचे कौशल्य, स्पर्धेचा मार्ग, पायाभूत सुविधा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने परिसराची क्षमता अधोरेखित होत आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात खिलाडूवृत्ती व स्पर्धात्मकता वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत श्री. पवार म्हणाले की, प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन स्पर्धेचे सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत मोलाचे सहकार्य केले आहे.
स्पर्धेच्या मार्गालगत ग्रामीण भागात नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी घटक स्वयंशिस्त पाळून खेळाडू व त्यांचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी दुतर्फा उभे होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेसाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे सायकलपटूंनीही व्यक्त केले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे जिल्हा प्रशासन समन्वयाने कार्य करत असून बजाज, सिरम इन्स्टिट्यूट, पंचशील ग्रुप यांसारख्या नामांकित कंपन्या, आरोग्य संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी ही स्पर्धा आपलीच मानून सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Back to top button