स्थानिक

बारामतीत बनावट रेमडेसीवीर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… पॅरासिटामोलच्या गोळ्यांच्या द्रावणाची केली जात होती विक्री तर इंजेक्शन घेतल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा!

बारामती तालुका पोलिसांनी चौघेजण केली अटक!

बारामतीत बनावट रेमडेसीवीर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… पॅरासिटामोलच्या गोळ्यांच्या द्रावणाची केली जात होती विक्री तर इंजेक्शन घेतल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा!

बारामती तालुका पोलिसांनी चौघेजण केली अटक!

बारामती वार्तापत्र

कोरोना संक्रमित रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड ओतून त्याची ३५ हजार रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. बारामती तालुका पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

सध्या सर्वत्र रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या काळात रुग्णसेवेसाठी अनेकजण झटत आहेत. मात्र, दुसरीकडे काहीजण कोरोना आपत्तीचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार बारामतीत केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली

पोलिसांकडून चौघांना अटक

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.

आरोपींवर गुन्हा दाखल

बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला 35 हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम 420/34, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आलीय. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलीय. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!