आपला जिल्हा

बारामतीत मोठी ऑनलाइन फसवणूक; गिरीराज हॉस्पिटलमधून तब्बल ९२.५० लाखांचा अपहार

एकूण ९२.५० लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली

बारामतीत मोठी ऑनलाइन फसवणूक; गिरीराज हॉस्पिटलमधून तब्बल ९२.५० लाखांचा अपहार

एकूण ९२.५० लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील नामांकित गिरीराज हॉस्पिटलशी संबंधित एक धक्कादायक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या खात्यांमधून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात वळवून अपहार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार, संबंधित इसमाने अत्यंत चलाखीने बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळवत दोन वेगवेगळ्या खात्यांमधून मोठ्या रकमेचे व्यवहार केले. एका खात्यातून ४८ लाख रुपये तर दुसऱ्या खात्यातून ४४ लाख ५० हजार रुपये अशा एकूण ९२.५० लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली.हा प्रकार सायबर फसवणुकीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, आरोपीने कोणत्या माध्यमातून खात्यांची माहिती मिळवली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. पोलिसांकडून संबंधित बँक व्यवहारांची माहिती, आयपी अ‍ॅड्रेस, तसेच व्यवहार कुठून करण्यात आले याचा मागोवा घेतला जात आहे.

दरम्यान, शहरात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणत्याही संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये, तसेच बँकिंग संबंधी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली असून, इतक्या मोठ्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Back to top button