बारामतीत राष्ट्रवादीची आढावा बैठक भावनिक वातावरणात संपन्न; “दादांचे स्वप्न पूर्ण करणार” – जय दादा
कार्यकर्त्यांना मुक्तपणे संवाद

बारामतीत राष्ट्रवादीची आढावा बैठक भावनिक वातावरणात संपन्न; “दादांचे स्वप्न पूर्ण करणार” – जय दादा
कार्यकर्त्यांना मुक्तपणे संवाद
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामती तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे प्रतिनिधी, बूथ कमिटी सदस्य व समन्वयक यांची आढावा बैठक शनिवार दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कसबा, बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडली.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. जयदादा उपस्थित होते. बैठकीदरम्यान त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मुक्तपणे संवाद साधण्याची संधी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला.
बैठकीत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या जीवनगाथेचे दर्शन घडवण्यात आले. त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय, त्या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल तसेच त्यांच्या खास विनोदी शैलीतील आठवणी आणि किस्से यांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांनी प्रत्येक गावाचा विकास करताना कधीही पक्षभेद किंवा जातीभेद न करता सर्वांना समान न्याय दिला. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाशी त्यांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे.
जय दादांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दादा नेहमी म्हणायचे तुम्ही आहात म्हणून मी आहे.” कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, “मी दादांचे रक्त आहे… तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार, हा शब्द देतो.”
अजितदादांच्या अपघाताबाबत बोलताना त्यांनी संयमित भूमिका घेत, “या विषयावर मला बोलायचे आहे, मात्र आधी अधिकृत अहवाल येऊ द्या, त्यानंतर सविस्तर बोलेन,” असे स्पष्ट केले. भावनिक वातावरणात त्यांनी पुढे सांगितले की, “दादा गेलेत हे अजूनही खरे वाटत नाही… आज येतील, उद्या येतील, त्यांचा फोन येईल असे वाटत राहते. पण आज तुमच्या सर्वांच्या मध्येच मला दादा दिसत आहेत,” या शब्दांनी सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली.
जय दादांनी माध्यमांबाबत नाराजी व्यक्त करत लिफ्टमधील प्रसंगाचा उल्लेख केला. तसेच आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची गरज काय होती, याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
“दादा जसे शब्दाचे पक्के होते, तसेच मीही शब्दाचा पक्का आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास दृढ केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही सर्वांची भावना असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, तसेच सर्व कार्यकर्त्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच येत्या 6 एप्रिल ला आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांना विक्रमी मतांनी निवडून देऊन अजितदादांना खरी श्रद्धांजली अर्पण करू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री सुनील बनसोडे, पक्ष निरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे यांसह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दादा नेहमी म्हणायचे तुम्ही आहात म्हणून मी आहे,” असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “मी दादांचा रक्त आहे… तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार,” हा शब्द देत त्यांनी विश्वास दिला. “दादा गेलेत हे अजूनही खरे वाटत नाही… तुमच्यातच मला दादा दिसतात,” असे सांगत त्यांनी भावना व्यक्त केल्या. अपघाताबाबत संयम ठेवत, “अधिकृत अहवाल आल्यानंतरच बोलेन,” असे स्पष्ट केले.
“दादा जसे शब्दाचे पक्के होते, तसेच मीही आहे,” असे म्हणत त्यांनी निर्धार व्यक्त केला आणि शेवटी आवाहन केले “दादांचे बारामतीचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचे आहे.”






