बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यातील सायरन वाजवण्यावरून चर्चांना उधाण
आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर होऊ नये

बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यातील सायरन वाजवण्यावरून चर्चांना उधाण
आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर होऊ नये
बारामती वार्तापत्र
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे काल बारामती दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बारामती शहरातील व ग्रामीण भागातील काही ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर बारामती येथील कृष्णासागर हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.
मात्र, लक्ष्मण हाके बारामतीतून परत जात असताना त्यांच्या ताफ्यातील पुढील बाजूला असलेल्या पेट्रोलिंग वाहनाने पुढे कोणतीही अडचण नसताना सायरन वाजवला.यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री किंवा इतर कोणतेही मंत्री बारामतीत दौऱ्यावर आले असतानाही अशा प्रकारे सायरन वाजवून आपला मोठेपणा दाखवताना सहसा दिसून येत नाही. मात्र लक्ष्मण हाके हे जेव्हा जेव्हा बारामतीत येतात, तेव्हा त्यांच्या दौऱ्यावेळी सायरनचा वापर केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
यामुळे हा सायरन वापर कायदेशीर आहे की बेकायदेशीर, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत नेत्यांचे दौरे, भेटीगाठी आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा सायरनसह वापर होणे योग्य आहे का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर होऊ नये, अशी अपेक्षा असते. मग अशा दौऱ्यांदरम्यान पोलीस वाहनांचे सायरन वाजवून नेमके काय साध्य केले जात आहे, आणि त्यामागे प्रशासनाची भूमिका काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची चौकशी होणार का, तसेच सायरन वापराबाबत स्पष्टता दिली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






