बारामतीत विविध ठिकाणी टी. सी. कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सायबर जनजागृतीचे कार्यक्रम
नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून बचावाचे उपाय सांगण्यात आले.

बारामतीत विविध ठिकाणी टी. सी. कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सायबर जनजागृतीचे कार्यक्रम
नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून बचावाचे उपाय सांगण्यात आले.
बारामती वार्तापत्र
आजच्या युगात मोबाईल बँकिंग, ऑनलाईन खरेदी, डिजिटल पेमेंट्स, सोशल मिडिया अशा विविध माध्यमातून व्यवहार वाढले असून त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील मोठ्या वेगाने वाढत आहे. नागरिकांनी सावध राहून तांत्रिक बाबींची योग्य माहिती करून घेणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती व क्विक हील फाउंडेशन तर्फे सायबर सुरक्षा जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दि. 22 ऑगस्ट रोजी बारामती रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी प्रवाशांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती केली. नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून बचावाचे उपाय सांगण्यात आले. रेल्वे स्टेशन मास्टर श्री.प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले की, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथे दिलेला जनजागृती संदेश प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरेल. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बसस्थानक व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी राबवलेली सायबर जनजागृती ही प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
दि. 23 ऑगस्ट रोजी इस्कॉन श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भाविकांमध्ये सायबर जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भक्तांना सुरक्षित मोबाईल वापर, बँक व्यवहारांमधील काळजी, संशयास्पद लिंक टाळण्याचे महत्व समजावून सांगितले. धार्मिक वातावरणाशी सुसंगत दिलेल्या या संदेशाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. प्रभुजी गौरंग दास यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा केले.
दि. 28 ऑगस्ट रोजी स्वामी समर्थ मठात विद्यार्थ्यांनी पथनाट्य व माहितीपर सादरीकरणाद्वारे भाविकांना सायबर सुरक्षिततेविषयी संदेश दिला. मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांनी विद्यार्थ्यांचा संदेश उत्साहाने ऐकला.
दि. 29 ऑगस्ट रोजी प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयासमोर व बारामती बसस्थानकात सायबर जनजागृती मोहीम राबविली गेली. या ठिकाणी घोषवाक्ये, माहितीपत्रके, प्रात्यक्षिके व नाटिकांच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक करण्यात आले. प्रवासी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या माहितीपूर्ण सादरीकरणाचे स्वागत केले.या उपक्रमाला तहसीलदार श्री. गणेश शिंदे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कार्याची दाखल घेतली. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी अशी मोहिम समाजासाठी फार उपयोगी ठरते. विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. प्रशासन अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य करेल.
यासोबतच, बारामती गणेश उत्सव या सांस्कृतिक महोत्सवात देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर रोजी सादर केला. शहरात उभारलेल्या नटराज नाट्य कला मंदिर येथील बारामती गणेश फेस्टिवलच्या मंडपांमध्ये कऱ्हेचे कलावंत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जनजागृती पर मोहीम राबवली. मंडप परिसरात नाटिका, घोषवाक्ये व माहितीपत्रकांच्या माध्यमातून उपस्थितांना ऑनलाईन फसवणुकीपासून कसा बचाव करावा याची माहिती देण्यात आली.
अनेक भक्तांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. “धार्मिक वातावरणात मिळालेला हा जागृती संदेश खरोखरच उपयुक्त आहे,” अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. गणेश मंडळाच्या व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील काळात अशाच सामाजिक उपक्रमात सक्रिय राहण्यास प्रेरित केले. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत बारामती परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयामध्ये १२० पेक्षा जास्त प्रेझेन्टेशन घेऊन आणि ५० पेक्षा जास्त महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालये, हॉटेल, अकॅडेमि, कार्यालये अश्या विविध सार्वजनिक ठिकाणे सायबर प्रबोधन केले. समाजाच्या विविध स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या सर्व उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सलमा शेख उपक्रम समन्वयक यांनी काम पाहिले.