बारामतीत शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला 1.30 कोटींचा गंडा
आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये

बारामतीत शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला 1.30 कोटींचा गंडा
आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका व्यावसायिकाला तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये संबंधित व्यावसायिकाच्या मोबाईलवर ‘F24 Indian Stock Market Investors Discussion Group’ या नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना अॅड करण्यात आले.
या ग्रुपमध्ये असलेल्या व्यक्तींनी स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचे भासवून गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही मार्गदर्शन देत त्यांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला.
यानंतर ‘Farley LLC’ नावाचे एक संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. या अॅपद्वारे शेअर ट्रेडिंग करून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून काही प्रमाणात नफा दाखवण्यात आला, त्यामुळे फिर्यादींचा विश्वास अधिक दृढ झाला.
यानंतर आरोपींनी विविध कारणे सांगत मोठ्या गुंतवणुकीस प्रवृत्त केले. 25 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमधून आरटीजीएस, ऑनलाइन ट्रान्सफर आदी माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात आले. एकूण रक्कम 1 कोटी 30 लाखांवर पोहोचली.
मात्र, एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही. उलट संबंधित आरोपींनी अचानक संपर्क तोडला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी आणि आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






