बारामतीत शॉर्टसर्किटमुळे पेट्रोल पंपाला आग; वेळीच नियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला
काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात

बारामतीत शॉर्टसर्किटमुळे पेट्रोल पंपाला आग; वेळीच नियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला
काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात
बारामती वार्तापत्र
काल सायंकाळच्या सुमारास शहरातील इंदापूर चौकातील पंपावर अचानक आग लागल्याची घटना घडली. सध्या हा पंप नंदनने चालवण्यास घेतला असून, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील एका सतर्क नागरिकाने तातडीने उपनगराध्यक्ष सौ. श्वेता योगेश नाळे यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. माहिती मिळताच नाळे यांनी तत्काळ हालचाली करत अग्निशामक दलाचे कुलरवार साहेब, स्थानिक पोलीस स्टेशन तसेच महावितरणचे अधिकारी जमाले यांच्याशी संपर्क साधला.
नाळे यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या वायरमनना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी मुख्य वीज पुरवठा (मेन लाईन) बंद करून पंपातील विद्युत कनेक्शन खंडित केले. दरम्यान, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पंपावर पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टाक्या असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या संपूर्ण घटनेत उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, अग्निशामक दल, पोलीस कर्मचारी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि समन्वय कौतुकास्पद असून, नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.






