बारामतीत श्री महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त साधेपणात भव्य शोभायात्रा संपन्न
सुमारे 90 साधू-साध्वींचा सहभाग होता.

बारामतीत श्री महावीर स्वामी जन्मकल्याणकानिमित्त साधेपणात भव्य शोभायात्रा संपन्न
सुमारे 90 साधू-साध्वींचा सहभाग होता.
बारामती वार्तापत्र
मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2625 व्या जन्मकल्याणकानिमित्त बारामती शहरात भक्तिभावपूर्ण वातावरणात शोभायात्रा उत्साहात पार पडली.
बारामती येथील श्री जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आयंबिल ओलीनिमित्त शहरात आगमन झालेले परमपूज्य गच्छाधिपती श्रीमद विजय युगभूषण सुरीश्वरजी महाराज तसेच साध्वीवर्या श्री कलानिधीश्रीजी महाराज यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सुमारे 90 साधू-साध्वींचा सहभाग होता.
शोभायात्रेची सुरुवात सकाळी 8 वाजता श्री चंद्रप्रभ मंदिर येथून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून—स्टेशन रोड, राम गल्ली, गांधी चौक, भिगवण चौक—मार्गक्रमण करत ही रथयात्रा पुढे सरकली. या दरम्यान श्री त्रिभुवन पार्श्वनाथ मंदिर येथे दर्शन घेण्यात आले.
शेवटी श्री विमलनाथ मंदिर येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी संघातील श्रावक-श्राविका, लहान मुले तसेच अनेक पाहुणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर गुरु महाराजांचे प्रेरणादायी प्रवचन झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.
जन्मकल्याणकानिमित्त सामाजिक उपक्रमांनाही सुरुवात करण्यात आली असून, जनावरांसाठी पाण्याच्या टँकरचे वितरण तसेच चाऱ्याने भरलेला एक ट्रक देण्यात आला.
दरम्यान, बारामतीचे लाडके नेते अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची रथयात्रा नेहमीप्रमाणे दणदणाटात न होता अत्यंत साध्या, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मनोज मुथा यांनी दिली.
यावेळी श्री विमलधाम परिसरातील चौकाचे “श्री विमलधाम चौक” असे नामकरण करण्यात आले असून, त्याचा फलक गुरु महाराज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
एकूणच, धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि साधेपणाचा संगम असलेला हा सोहळा बारामतीकरांसाठी विशेष ठरला.






