स्थानिक

बारामतीत स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या मुलाला जीवदान; डॉक्टर आणि लाईफ गार्डच्या तत्परतेचे कौतुक

“मुलाला पोहता येते का?”

बारामतीत स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या मुलाला जीवदान; डॉक्टर आणि लाईफ गार्डच्या तत्परतेचे कौतुक

“मुलाला पोहता येते का?”

बारामती वार्तापत्र

बारामतीतील वीर सावरकर स्विमर्स क्लबमध्ये गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी घडलेल्या एका प्रसंगामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, क्लबच्या लाईफ गार्डच्या सतर्कतेमुळे आणि उपस्थित डॉक्टरांनी वेळेत दिलेल्या उपचारांमुळे एका मुलाचे प्राण वाचले असून सध्या तो मुलगा सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी साळुंखे हा मुलगा सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वीर सावरकर स्विमिंग पूल येथे पोहण्यासाठी आला होता. यावेळी स्विमर्स क्लबच्या स्टाफने तिकीट देताना मुलाच्या वडिलांना “मुलाला पोहता येते का?” अशी विचारणा केली होती.

त्यावर वडिलांनी मुलाला पोहता येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिकीट काढून मुलाला स्विमिंग पूलमध्ये पाठविण्यात आले.
मात्र, पूलमध्ये गेल्यानंतर काही क्षणांतच संबंधित मुलगा पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. ही बाब स्विमर्स क्लबचे लाईफ गार्ड दत्ता तेलंगे यांच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता पाण्यात उडी घेत मुलाला बाहेर काढले. या प्रसंगी स्विमिंगसाठी आलेले डॉ. राधेय खलाटे यांनी तत्काळ मुलाला सीपीआर देत प्राथमिक उपचार केले. त्यामुळे मुलाची प्रकृती स्थिर झाली असून सध्या तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर स्विमर्स क्लबच्या वतीने पालकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. आपल्या मुलाला व्यवस्थित पोहता येत असेल तरच त्याला स्वतंत्रपणे स्विमिंग पूलमध्ये पाठवावे.

जर मुलाला पोहता येत नसेल, तर क्लबने नियुक्त केलेल्या अधिकृत प्रशिक्षकांकडे पास काढून योग्य प्रशिक्षणाखालीच पोहण्यास पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, लाईफ गार्ड दत्ता तेलंगे यांच्या प्रसंगावधानाचे तसेच डॉ. राधेय खलाटे यांनी दिलेल्या तातडीच्या मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

Back to top button