बारामतीत होमगार्ड जवानावर मारहाण; प्रशासन ॲक्शन मोडवर
होमगार्ड जवान हे स्वयंसेवी तत्त्वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात

बारामतीत होमगार्ड जवानावर मारहाण; प्रशासन ॲक्शन मोडवर
होमगार्ड जवान हे स्वयंसेवी तत्त्वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(1), 115(2), 351(2)(3), 352 प्रमाणे आरोपी विकास दादा लोंढे, रा. अनंतनगर आमराई, ता. बारामती जि. पुणे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दिनांक 15/02/2026 रोजी महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर, बारामती येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना वाहतूक नियंत्रण व गर्दी नियमनासाठी होमगार्ड जवान सिंध्दार्थ भारत शिंदे हे अधिकृत गणवेशात व नेमप्लेटसह शासकीय कर्तव्य बजावत होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बॅरेकेटींगमधून कोणत्याही वाहनास प्रवेशबंदी करण्यात आलेली असताना आरोपीने जाणीवपूर्वक मोटारसायकल आत नेण्याचा प्रयत्न केला. त्यास नियम समजावून सांगितल्यावर आरोपीने शासकीय कर्मचाऱ्यावर अश्लील शिवीगाळ, धमकी देत प्रत्यक्ष मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सार्वजनिक ठिकाणी वर्दीधारी कर्मचाऱ्यावर हात उगारणे ही अत्यंत गंभीर व कायद्याला आव्हान देणारी बाब असून याकडे पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.
होमगार्ड दल हे महाराष्ट्र पोलीस दलाचे पूरक सहाय्यक बल असून 1962 पासून देश व राज्याच्या आपत्कालीन, नैसर्गिक आपत्ती, कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक बंदोबस्ताच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
होमगार्ड जवान हे स्वयंसेवी तत्त्वावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कार्यरत असतात. कायद्यानुसार होमगार्ड हे “Public Servant” या श्रेणीत मोडतात व त्यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे, त्यांच्यावर बलप्रयोग करणे किंवा धमकी देणे हे दंडनीय व गंभीर गुन्हे आहेत.
बारामती शहर पोलीस प्रशासन स्पष्टपणे जाहीर करते की, शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा होमगार्ड जवानांच्या वर्दीवर हात घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रवृत्तीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायद्यापुढे सर्व समान असून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका अवलंबली जाईल.
नागरिकांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व होमगार्ड दलास सहकार्य करावे. आपत्कालीन सेवा देणाऱ्या जवानांचा सन्मान राखणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना आहे. प्रशासन समाजविघातक कृत्यांना कधीही माफी देणार नाही व कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शासन करेल.






