स्थानिक

बारामतीत ॲम्बुलन्स सेवा रामभरोसे नागरिकांचे होतायेत हाल

बारामतीतून समोर आलेल्या एका गंभीर प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बारामतीत ॲम्बुलन्स सेवा रामभरोसे नागरिकांचे होतायेत हाल

बारामतीतून समोर आलेल्या एका गंभीर प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती येथील नामांकित हॉस्पिटलमधून गावडे आडनावाच्या रुग्णाला काल मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यानुसार स्थानिक खासगी ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली.

मात्र ॲम्बुलन्स हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर तिच्यातील असणाऱ्या डॉक्टरांच्या लक्षात आली की आवश्यक वैद्यकीय उपकरणे एकामागोमाग बंद पडू लागली. ही बाब लक्षात येताच रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ ॲम्बुलन्स परत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली.
दरम्यान, ॲम्बुलन्स चालकाने मालकाला व संबंधित दुसऱ्या ॲम्बुलन्स धारकाला फोन करून बोलावले. त्यांनी येऊन उपकरणे सुरू करण्याचा प्रयत्न केला; परंतु ती कार्यान्वित झाली नाहीत. अखेर दुसरी ॲम्बुलन्स मागवून रुग्णाला त्यामध्ये हलविण्यात आले.

तथापि, पुण्याकडे रवाना होत असताना दुसऱ्या ॲम्बुलन्समध्येही डिझेल भरण्यासाठी थांबावे लागणार असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. गंभीर अवस्थेतील रुग्णासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना अशा प्रकारे उपकरणे बंद पडणे किंवा इंधनाअभावी विलंब होणे अत्यंत धोकादायक असल्याचे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

या घटनेमुळे बारामतीतील खासगी ॲम्बुलन्स सेवांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशा निकृष्ट किंवा अपूर्ण तपासणी झालेल्या वाहनांवर कारवाई होणार का?

शासनाकडून ॲम्बुलन्सची नियमित तपासणी केली जाते का?

फिटनेस प्रमाणपत्र, वैद्यकीय उपकरणांची कार्यस्थिती, इंधन उपलब्धता याची खातरजमा कोण करतो?

तपासणी अहवाल सार्वजनिक का केले जात नाहीत?

स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठिकाणी केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून सेवा दिली जाते आणि रुग्णांच्या जीवितापेक्षा नफा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे “जीवघेणा प्रवास” कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याची तसेच सर्व ॲम्बुलन्स सेवांची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित सेवांमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Back to top button