क्राईम रिपोर्ट

बारामतीत ‘100 यार्ड’च्या आत तंबाखू विक्री पडली महागात; COTPA अंतर्गत कारवाई

दोन विक्रेते कारवाईच्या कचाट्यात

बारामतीत ‘100 यार्ड’च्या आत तंबाखू विक्री पडली महागात; COTPA अंतर्गत कारवाई

दोन विक्रेते कारवाईच्या कचाट्यात

बारामती वार्तापत्र 

विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान दोन स्वतंत्र ठिकाणी सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने संबंधित विक्रेत्यांविरुद्ध COTPA अधिनियम 2003 च्या कलम 6(b) व शिक्षेसाठी कलम 24 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

दि. 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.10 वाजता फातिमानगर, जगतापमळा येथील मुस्कान टी हाऊस येथे पोलिसांनी तपासणी केली. हे दुकान कारभारी धोंडिबा आण्णा सातव शाळेच्या प्रतिबंधित परिसरात असल्याचे आढळून आले. तेथे सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने गनीभाई बाबुलाल शेख (वय 61) यांच्याविरुद्ध खटला रजि. नं. 07/2026 दाखल करण्यात आला.

त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता खंडोबानगर येथील अमोल पान शॉपवरही तपासणी करण्यात आली. शैक्षणिक संस्थेच्या प्रतिबंधित परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्याने शिल्पा अमोल भोसले (वय 35) यांच्याविरुद्ध खटला रजि. नं. 08/2026 दाखल करण्यात आला.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या व तंबाखू विक्रीच्या ठिकाणांची तपासणी केली.

COTPA कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरात सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. तसेच 18 वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासही कायद्याने प्रतिबंध आहे.

बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पानटपरी चालक, दुकानदार आणि इतर विक्रेत्यांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button