
बारामतीत कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसीस चा धोका…तब्बल 14 रुग्ण आढळून
लवकरच ३० बेडचे रुग्णालय
बारामती वार्तापत्र
म्युकर मायकोसिसचे लोण आता बारामतीतही पसरु लागले आहे. बारामतीत नटराज नाट्य कला मंडळ व इंडीयन डेंटल असोसिएशन फलटण बारामती शाखेच्या वतीने आयोजित शिबीरामध्ये तब्बल 14 रुग्ण आढळून आहे आहेत.
कोरोना सारख्या वैश्विक महामारीचे थैमान सुरूच असताना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. प्रामुख्याने कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बारामतीत काल झालेल्या शिबीरामध्ये 650 हून अधिक रुग्णांची तपासणी केली गेली. या तपासणीत 14 जणांना म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. या बुरशीजन्य आजाराचे निदान झाल्यानंतर काही जणांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासणार असून इतर चाचण्याही कराव्या लागणार आहेत.
म्युकर मायकोसिसचे लक्षणे
कोणतीही भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. दात दुखणे, दातातून पस येणे, तोंडाचा अर्धा भाग दुखणे, टाळूवर तपकिरी किंवा काळसर डाग पडणे, डोळे लाल होणे, ताप येणे, नाकातून दुर्गंधी येणे आदी लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करून घ्यावेत.– डॉ. विश्वराज निकम, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन फलटण शाखा
दरम्यान, या रुग्णांना गरजेच्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिका-यांच्या स्तरावर केला जाणार असल्याचे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे यांनी नमूद केले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयातून रुग्णांवर उपचाराची सुविधा दिली जाईल. बारामतीत आता या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे दिसत आहे, या पार्श्वभूमीवर या रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय करण्याच्या दृष्टीने विचार सुरु असून या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. या बाबत जनजागृती करण्यासह वेळेवर तपासणी करण्यावरही भर दिला जात आहे.