बारामतीवर शोककळा; वीर सावरकर तलावात पोहताना अरुण फराटे यांना हृदयविकाराचा झटका
उपचार, शस्त्रक्रिया यशस्वी... तरी नियतीपुढे हार

बारामतीवर शोककळा; वीर सावरकर तलावात पोहताना अरुण फराटे यांना हृदयविकाराचा झटका
उपचार, शस्त्रक्रिया यशस्वी… तरी नियतीपुढे हार
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील वीर सावरकर तलावात पोहत असताना अरुण बाबुराव फराटे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेने बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण फराटे हे वीर सावरकर तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहत असतानाच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. उपस्थितांनी तातडीने त्यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत शस्त्रक्रियाही केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती मिळाल्यानंतरही काही वेळातच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांचे निधन झाले.
उपचारांची शर्थ… मात्र नियतीपुढे प्रयत्न अपुरे
कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून उपचारांची शर्थ करण्यात आली. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही अरुण फराटे यांना वाचवता आले नाही.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
तलाव परिसरात हळहळ
पोहत असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे वीर सावरकर तलाव परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेने पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अचानक प्रकृती बिघडण्यामागील नेमके वैद्यकीय कारण डॉक्टरांच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.






